रेल्वेच्या तिकीट दरात मुंबई ते औरंगाबाद विमानातून!

Foto

औरंगाबादविमानतळावरून सुरू करण्यात आलेल्या विमान सेवेमुळे शहरातील नागरिकांना स्वस्तात विमान प्रवास करण्याची संधी उपलब्ध होत आहे. 

विमानतळावरून सुरू करण्यात आलेल्या विमान सेवेमुळे मराठवाड्यातील  नागरिकांना स्वस्तात विमान प्रवास करण्याची संधी उपलब्ध होत आहे. रेल्वेच्या 'एसी फर्स्ट क्लास' वर्गाच्या तिकीट दरापेक्षा कमी दरात हा प्रवास होत आहे. त्यामुळे कमी कालावधीत मुंबईहून औरंगाबाद गाठता येत आहे. दिल्ली ते औरंगाबाद या विमान प्रवासाचेही सध्याचे दर कमी करण्यात आले आहेत.

औरंगाबाद विमानतळावरून गेल्या काही महिन्यांत विमानांची संख्या वाढली आहे. औरंगाबदहून अहमदाबाद, हैदराबाद, दिल्ली, मुंबई, उदयपूर या शहरांसाठी हवाई प्रवासाच्या सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी औरंगाबाद ते मुंबई या मार्गावर हवाई प्रवासासाठी नऊ ते १८ हजार रुपयांदरम्यान भाडे आकारण्यात येते होते. विमान कंपन्यांनी सुरू केलेल्या नव्या विमान सेवांमुळे हे दर कमी करण्यात आले आहेत.

मुंबईहून नंदीग्राम किंवा देवगिरी एक्स्प्रेसने औरंगाबाद गाठण्यासाठी साधारणत: नऊ तासांचा वेळ लागत आहे. या रेल्वेतून 'एसी फर्स्ट क्लास' वर्गातून प्रवास करण्यासाठी प्रती प्रवासी 1580 रुपये भाडे आहे. एअर इंडिया आणि इंडिगो या दोन्ही विमान कंपन्यांनी मुंबईहून औरंगाबादला येण्यासाठी सध्या प्रती प्रवासी किमान दर हे 1128 रुपये जाहीर केला आहे.

दिल्लीला जाण्यासाठी औरंगाबादहून सचखंड एक्स्प्रेस आणि मराठवाडा संपर्क क्रांती या दोन रेल्वे उपलब्ध आहे. मराठवाडा संपर्क क्रांती एक्स्प्रेस रेल्वे आठवड्यातून एकदा धावते. सचखंड एक्स्प्रेसमधून दिल्लीहून औरंगाबादला येण्यासाठी 'एसी टू टायर'मध्ये दोन हजार ३०० रुपये प्रती प्रवासी मोजावे लागत आहेत. विमानाने दिल्लीहून औरंगाबाद गाठण्यासाठी विमान प्रवाशांना एक हजार ६०२ रुपयांपासून ते तीन हजार ९८ रुपयांपर्यंत भाडे आकारण्यात येत आहे. मागणी वाढल्यास या दरात काही प्रमाणात बदल होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. रेल्वेच्या दरापेक्षाही विमानाचे दर कमी झाल्याने, याचा थेट फायदा विमान प्रवाशांना होत आहे.

हैदराबादचेही दर कमीच

औरंगाबादहून हैदराबादला जाण्यासाठी विमान दर कमी केले आहेत. काही विमान प्रवाशांना गेल्या दोन दिवसांपूर्वी ट्रू जेटच्या विमानाचे तिकीट एक हजार ३०० रुपयांपर्यंत मिळाले. सध्या हैदराबादच्या विमानाचे दरही कमी झाले असल्याची माहिती विमान कंपनीच्या प्रतिनिधींकडून देण्यात आली आहे. मार्च महिन्यात परीक्षा आणि मार्चअखेरची कामे असतात. या महिन्यातही विमान प्रवासाचे दर कमी राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker